जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची जागा भूसंपादन प्रक्रियेबाबत दोन महिन्यांची मुदत पालिकेने मागितली आहे. भूसंपादन करूनच या जागेवर सर्वानुमते भूमिपूजन करू. जागेबाबत ११ मेअखेर ठोस निर्णय न झाल्यास शिवप्रेमीच अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतील, असा इशारा शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल फौंडेशन व जयसिंगपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा आरक्षित जागेवर कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर, शंकर नाळे, संजय चव्हाण, अशोक कराळे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्याहस्ते शिवप्रतिमा पूजन होणार असून अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर उपस्थित राहणार आहेत.