कोल्हापूर : सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्यापर्यावरणशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि. १८) आयोजित केलेल्या प्रा. नरहर विष्णू कारेकर या विज्ञानविषयक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जैवविविधतेचे मानवी जीवनावरील परिणाम’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते.
डॉ. बाचूळकर म्हणाले, पृथ्वीतलावर असलेल्या फक्त १८ ते २० टक्के जैवविविधतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. पृथ्वीच्या आणि पर्यायाने सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी जैवविविधता समजून घेण्यापूर्वीच ती नष्ट होत आहे.
जगभरात केवळ १७ देश जैवविविधतेने नटले आहेत. त्यात भारताचा समावेश असणे ही जरी आनंद व अभिमान वाटणारी गोष्ट असली, तरी जैवविविधता नष्ट करीत चाललेल्या १० देशांच्या यादीतदेखील भारताचा समावेश असल्याचा खेद आहे. या कार्यक्रमात डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. निर्मला पोखर्णीकर यांनी आभार मानले.नैतिक जबाबदारीजैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पडणे महत्वाचे आहे; अन्यथा भविष्यात आपणास नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.