येथील राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन आणि अन्य विविध संस्थांनी सोमवारपासून व्यापार सुरू करायचा निर्णय घेतला. त्याचे नियोजन आणि अन्य तयारीसाठी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारिणीची विशेष बैठक रविवारी बिझनेस हाऊस येथील कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, संचालक महेश जेवरानी, प्रताप पोवार, विपुल पारेख, अनिल पिंजानी, दीपक पुरोहित, स्नेहल मगदूम, प्रीतेश दोशी यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर चर्चा केली. सकाळी नऊ वाजता सर्व व्यापाऱ्यांनी जनता बाझार चौकात एकत्रित येण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापार सुरू करत असलो, तरीही कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची आपली जबाबदारी पार पाडायची आहे. मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. या सर्व खबरदारी घेऊन व्यापार सुरू करावा, असे आवाहन अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे. लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
चौकट
प्रशासनाने सहकार्य करावे
अडीच महिन्यांच्या सलग बंदमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्तता प्रलंबित आहेत. भांडवलाची कमतरता, यासह विविध विषयावर राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. व्यापाऱ्यांच्या समोरील अडचणी गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ललित गांधी यांनी केले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
राजारामपुरी परिसरातील दुकाने : १७००
महाद्वार रोड परिसरातील दुकाने : ७५०
फोटो (२७०६२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारी बैठक, ०१) : कोल्हापुरात सोमवारपासून व्यापार, व्यवसाय सुरू करण्याबाबत राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठक रविवारी झाली. त्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी विपुल पारेख, प्रताप पोवार, अनिल पिंजानी आदी उपस्थित होते.