कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने पहिल्यांदाच प्रस्थापितांच्या मुळाला हात घातला. बहुजन समाजाची सत्तासंपादनाची ही झेप लक्षात आल्यानेच प्रस्थापित राजकीय नेते शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारीत आहेत.
‘वंचित’च्या भीतीनेच आपली सत्तास्थाने टिकविण्यासाठी ठरवून एकाच पक्षात पक्षांतर केले जात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही जमेतच धरत नाही, आमचा संघर्ष भाजपशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नागपूरहून निघालेल्या सत्तासंपादन रॅलीचा समारोप बुधवारी दुपारी कोल्हापुरात झाला. यानिमित्ताने निर्धार सभेसाठी आलेल्या आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवानंद हैबतपुरे, अण्णाराव पाटील, अनिल म्हमाने उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात सर्व २८८ जागा लढणारा आणि कार्यक्रम घेऊन येणारा आमचा एकमेव पक्ष आहे. पुढील आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पूर्ण तयारीनिशी आम्ही रिंगणात उतरलो आहोत. ‘एमआयआम’ने दरवाजे बंद केले आहेत; पण आमचे त्यांच्यासाठी खुलेच आहेत. त्यांनी कधीही यावे. स्वागत आहे, असे सांगून आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ने आघाडी तोडण्याचे काम केले, असा आरोप केला.