लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी नसल्या तरी साेशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. ‘आमचं ठरलंय.... गोकुळ उरलंय’ असे विरोधकांनी रान पेटविले असताना, ‘तुमचं ठरलंय... गोकुळ चांगलंच चाललंय’, ‘आम्हाला पटलंय, गोकुळ लै भारी चाललंय’ असे प्रत्युत्तर सत्तारूढ गटाने दिले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून पालकमंत्री सतेज पाटील यांची ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन चांगलीच गाजली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’ मतदारसंघात नवनवीन टॅगलाईन आल्या. ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे विरोधी गटाने ‘आमचं ठरलंय, आता गोकुळ उरलंय’ या टॅगलाईनची अक्षरश: धूम उडवून दिली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली आहे.
‘तुमचं ठरलंय, मात्र गोकुळ चांगलंच चाललंय’ व ‘आम्हाला पटलंय, गोकुळ लै भारी चाललंय’ अशी टॅगलाईन काढून जोरदार उत्तर देण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली आहे. यासह ‘तुमचं ठरलं असेल, पण आम्ही पण ध्यानात ठेवलंय... गोकुळ चांगलंच चाललंय’ याची सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या टॅगलाईनची जोरदार चर्चा सुरू आहे.