कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत आमची गावे नको, असे निवेदन शनिवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. परिसरातील १२ गावच्या नागरिकांनी हद्दवाढ थांबविण्याची मागणी केली आहे. ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याखेरीज निर्णय घेणार नाही असे आश्वासन मुश्रीफ यांनी त्यांना दिला. दरम्यान, या शिष्टमंडळाने खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्याकडेही आपली बाजू मांडली.कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण आणि प्रस्तावित हद्दवाढीत सहा गावांचा समावेश होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हद्दवाढीत समाविष्ट गावांच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी शनिवारी मुश्रीफ यांची जिल्हा बँक येथे भेट घेत निवेदन दिले. प्रस्तावित गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होउन वर्षही झाले नसताना हद्दवाढ करुन त्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणार का असा प्रश्नही कृती समितीने केला आहे. ही हद्दवाढ थांबवा, अन्यथा आंदोलन, मोर्चा, उपोषण आदी मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशाराही समितीने दिला आहे.या निवेदनावर उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, पाचगांवचे सरपंच प्रियंका पाटील, कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, मोरेवाडीचे सरपंच आनंदा कांबळे, वळीवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, नागांवच्या सरपंच विमल शिंदे, वाडीपीरच्या सरपंच शुभांगी मिठारी, नागदेववाडीचे सरपंच रविंद्र पोतदार, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत आमची गावे नको, ग्रामस्थांची मागणी
By संदीप आडनाईक | Published: December 30, 2023 7:32 PM