कोल्हापूर : बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अँड स्पोर्टस् क्लबच्यावतीने १२१ तासांचा रिले पद्धत स्केटिंगचा विश्वविक्रम अबाधित आहे. हा विक्रम एशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्डच्या शर्ती व अटींनुसार नोंदविला आहे. त्यामुळे १३१ तास रिले पद्धत स्केटिंग करून आमचा नोंदविलेला विक्रम मोडला म्हणणाऱ्यांविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवगंगा रोलर स्केटिंगच्यावतीने निखिल चिंदक यांनी शाहू स्मारक भवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरातील बापूजी साळुंखे स्केटिंग क्लब यांनी जो १२१ तासांचा विश्वविक्रम मोडल्याचा दावा केला आहे, हा दावा अत्यंत चुकीचा आहे. १२१ तासांच्या विक्रमामध्ये सलग १२१ तास स्केटिंग केले तर ३१५ जणांनी या विक्रमात सहभाग घेतला. याशिवाय ३१५०.६ किलोमीटर इतके अंतर स्केटर्सनी पार केले तर २०० मीटरचे १५७५३ इतके लॅ्प्स मारले गेले आहेत. त्यामुळे आमच्या क्लबने २९ मे २०१५ रोजी केलेला १२१ तासांचा विक्रम अबाधित आहे. १३१ तासांमध्ये साळुंखे रोलर स्केटिंग क्लबने अशा पद्धतीचे पॅरामीटर विक्रमावेळी केले नव्हते. त्यामुळे कदाचित १३१ तासांचा वेगळ्या प्रकारचा विक्रम असू शकतो. या विक्रमात केवळ १४६ जणांनी सहभाग घेतला होता. ज्यांनी हा विक्रम मोडल्याचा दावा केला आहे, तो निखालस खोटा आहे. दावा करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत हा वेगळा विक्रम असल्याचा खुलासा दोन्ही रेकॉर्ड बुकनी केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आम्ही केलेला १२१ तासांचा रिले पद्धत स्केटिंगचा विश्वविक्रम अबाधित असून, ज्यांनी विक्रम मोडल्याचा दावा केला आहे, तो निखालस खोटा आहे. दावा करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.- निखिल चिंदक,शिवगंगा रोलर स्केटिंग
आमचा विश्वविक्रम अबाधितच
By admin | Published: June 18, 2015 12:13 AM