चंदगड :
केवळ धोकादायक असलेल्या झाडांची तोड व्हावी, यासाठी पर्यावरणप्रेमी, वन व बांधकाम विभाग यांनी गुरुवारी (८) बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील झाडाची पाहणी केली. यावेळी ३३ पैकी केवळ ५ झाडे धोकादायक असून तीच तोडावीत, असा दम प्रा. एन. एस. पाटील व अॅड. संतोष मळवीकर यांनी बांधकाम विभागाला दिला.
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव-वेंगुर्ला व मलगेवाडी-कोदाळी मार्गावर विनाकारण झाडे तोडण्यात आली आहेत. त्यावेळी कागदोपत्री पाठपुरावा न करताच धोकादायक नसतानाही ती तोडण्यात आली. याविरोधात प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी वन, बांधकाम विभाग व पर्यावरण प्रेमी यांची बुधवारी बैठक घेतली.
यावेळी बांधकाम विभागाने परवानगी दिलेल्या ६१ पैकी उर्वरित ३३ झाडांची पाहणी करूनच त्याविषयी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी (८) बांधकाम विभागाचे उपअभियंता सासणे, वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, पर्यावरणप्रेमी शिष्टमंडळ यांनी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील ३३ झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये केवळ ५ झाडे धोकादायक असून तीच फक्त तोडण्याचे ठरले.
-- मैलकुलींकडून सर्वेक्षण
धोकादायक झाडांची यादी तयार करताना अधिकारी वर्गाने त्या झाडांची प्रत्यक्ष पाहणीच केली नाही. बांधकाम विभागात रस्त्यांच्या देखभालीसाठी असलेल्या मैलकुलींच्या सांगण्यावरून यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
यावेळी प्रभाकर खांडेकर, शामराव मुरकुटे, एम. एम. तुपारे यासह अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिनोळी येथे धोकादायक झाडांची अॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील व अधिकारी वर्गाने पाहणी केली.
क्रमांक : ०८०७२०२१-गड-१२