लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात येत असून, त्याआधी सर्व प्राथमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे गुरूवारपर्यंत ३,४०४ शिक्षकांपैकी केवळ ३ शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमाण किती झपाट्याने कमी येत आहे, याचे हे निदर्शक आहे.
दहा महिने शाळा बंद होत्या. सुरूवातीच्या काळात तर गावागावातील प्राथमिक शाळांमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची वास्तव्याची व्यवस्था केली जात होती. त्यांच्या चाचण्या झाल्यानंतर अलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर मगच त्यांना गावातील त्यांच्या घरी वास्तव्याला परवानगी दिली जात होती. गेल्याच आठवड्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. परंतु, शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांच्या चाचण्या सुरू आहेत. आतापर्यंत बारा तालुक्यांसह कोल्हापूर शहरातील ३,४०४ शिक्षकांच्या या चाचण्या झाल्या आहेत. यातील करवीर तालुक्यातील २ आणि आजरा तालुक्यातील १ असे तीनच शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जरी कोरोनाचे प्रमाण झपाट्याने कमी येत असले तरी दक्षता म्हणून ही चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
कोट
शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून, त्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येते. आरोग्य विभागाच्या सहकार्याने याचे नियोजन करण्यात आले असून, अगदी नगण्य प्रमाणात शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. जशा चाचण्या होतील तसतशा शाळा सुरू करण्यात येत आहेत.