मुरगूड : दहावी आणि बारावी परीक्षा केंद्राबाबत कोल्हापूर बोर्डाने तयार केलेल्या उपद्रवी व कुप्रसिद्ध केंद्राच्या यादीत अगदी वरच्या क्रमांकावर नाव असलेल्या मुरगूड केंद्राने आपली ओळख पुसली असून, गेल्या दोन वर्षांपासून सर्वच शाळांच्या शिक्षकांनी संघटितरित्या प्रयत्न केल्याने कॉपीमुक्तीला या केंद्रावर यश आले आहे. यामुळे बोर्डाने या केंद्राचे नाव कुप्रसिद्ध यादीतून काढून टाकले आहे. कॉपीमुक्तीमुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.इतर केंद्राप्रमाणेच गेल्या दोन वर्षांपूर्वी मुरगूड येथील दहावी आणि बाराची परीक्षा केंद्रावर चित्र होते. परीक्षा केंद्राच्या अवतीभोवती पालक हितचिंतकांचा गऱ्हाडा पडलेला दिसे. घोळके करून तरुण इमारतीमध्ये प्रवेश करत. बिनधास्तपणे कोणत्याही खोलीत जाऊन आपआपल्या सख्ख्या मित्रांना कॉपी पुरवत. पोलीस यंत्रणा तोकडी पडे. शिक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यास वाद हमखास ठरलेला. यातून एका शिक्षकाच्या घरावरही हल्ला करून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यामुळे दहावी-बारावीचे पर्यवेक्षण घेण्यालाच शिक्षक धजत नसत. बोर्डानेही हे केंद्र रद्द करून परीक्षा इतरत्र घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मार्च २०१४ मध्ये ‘शिवराज’चे प्राचार्य महादेव कानकेकर यांनी केंद्र संचालकाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शैलीवर परीक्षा पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल घडवण्याला सुरुवात केली. प्रथम बाहेरून होणारा त्रास कमी करण्यासाठी अधिकचा पोलीस फाटा केंद्राभोवती उभा केला आणि हुज्जत घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. अर्थातच पोलिसी खाक्यामुळे तरुणांवर दबाव निर्माण झाला. बाहेरचा उपद्रव कमी करून मग विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. मार्च २०१५ ला तर संपूर्ण केंद्र कॉपीमुक्त झाले. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सी.सी.टी.व्ही.चा वापर सुरू केल्याने यावर्षी बारावीची परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.बारावीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत गैरप्रकार करताना एकाही विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे कॉपीमुक्त केंद्र म्हणून मुरगूड केंद्रावर शिक्कामोर्तब करून कुप्रसिद्ध केंद्राच्या यादीतून बोर्डाने मुरगूडला वगळले असल्याची माहिती बारावीचे केंद्र संचालक महादेव कानकेकर यांनी दिली.दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत असून, या केंद्रावर साडेपाचशेहून अधिक विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, बारावीप्रमाणे हीही परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करण्याचा इरादा असून, परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी अगदी निर्भयपणे परीक्षेला सामोरे जावे. - राजेंद्र व्हनबट्टे, दहावीचे केंद्र संचालक
मुरगूडचे दहावी परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध यादीतून बाहेर
By admin | Published: February 29, 2016 11:36 PM