सांगली : जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात आज, मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे वारणेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली. तालुक्यातील नदीकाठाचे काही रस्ते व पूलही बंद झाले आहेत. सांगली व मिरज शहरांना दिवसभर पावसाने झोडपल्याने शहरात पाणी साचून राहिले आहे. आज सकाळी आठपर्यंत दुष्काळी भागात तुरळक पाऊस झाला असून, जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाचा जोर वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. संततधारेमुळे कृष्णा व वारणा नदीपात्रातही वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. कधी तुरळक, कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पावसाने जिल्हा चिंब भिजत आहे. जिल्ह्यात आज सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात झाला. त्यामुळे वारणा पात्राबाहेर पडली आहे. शिराळे खुर्द-मळणगाव पूल, कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर उद्या, बुधवारी मांगले-कार्वे पूल पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. / पान ८ वर१सांगली व मिरज शहरात दिवसभर पावसाची संततधार होती. सायंकाळी पाच वाजता अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने दोन्ही शहरे जलमय झाली. २शहराच्या सखल भागांसह क्रीडांगणे, मंडई, मुख्य रस्ता यावर पाणी साचून राहिले. सांगलीच्या स्टेशन रस्त्यासह बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.३गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सांगलीत शंभर फुटी रस्त्यावरील शामरावनगर, हनुमाननगर परिसरात गुडघाभर चिखल झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
वारणा नदी पात्राबाहेर
By admin | Published: July 22, 2014 11:29 PM