जयसिंगपूर : येथील ल. क अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आज, शुक्रवारी दोनशेहून अधिक संतप्त शेतकऱ्यांकडून उद्रेक झाला. अकिवाटे संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड करीत टाळे ठोकण्यात आले. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची नासधूस करून कृष्णानदीवर पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींचे नुकसान करण्यात आले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, येत्या चार दिवसांत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद न झाल्यास औद्योगिक वसाहतीचा विद्युत पुरवठा तोडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.गेल्या दोन महिन्यांपासून ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे वसाहतीच्या पूर्व भागात असणाऱ्या शेती पिकाला मोठा फ टका बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेतात बियांणाची पेरणी केली आहे. बियाणाची उगवण झालेली असतानाच रसायनयुक्त दूषित पाणी पिकात साचून राहिल्याने संपूर्ण पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्या, आदी पिकांना फटका बसला आहे. याप्रश्नी महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाकडे तक्रारी दिल्यानंतर तलाठ्यांनी पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही दूषित पाणी सोडले जात होते. आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी सांडपाणी सोडणारी पाईप उद्ध्वस्त केली होती. गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीतून शेतात सोडण्यात आल्यामुळे अक्षरश: शेतीपिकात रसायनयुक्त पाण्याची तळी साचल्यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर हल्ला चढविला. दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सी.ई.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्पाकडे चाल करून या ठिकाणी असणारे मोटारी, पाईपांची नासधूस केली. उदगाव हद्दीत विहिरीवर असलेल्या मोटारी विहिरीत ढकलून दिल्या. त्यानंतर उदगाव येथे कृष्णा नदीवर वसाहतीकरिता पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीच्या फ्युजा काढल्या. दोन तास आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी कारखानदारांना वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला. आंदोलनानंतरही दिवसभर रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात शेतात जात होते. (प्रतिनिधी)
रसायनयुक्त सांडपाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक
By admin | Published: August 29, 2014 11:22 PM