उपाययोजना करण्याची मागणी
अमर पाटील
कळंबा : हिवताप, मलेरिया, डेंग्यू, अतिसार यांसह अन्य साथीच्या रोगांचा सध्या रंकाळा तलाव परिसरातील उपनगरात प्रादुर्भाव झाला आहे. साथीचे हे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. रंकाळा तलाव परिसरात वसलेल्या सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर, तपोवन, साळोखेनगर, आपटेनगर, राजलक्ष्मीनगर, कळंबा जेल, जीवबानाना पार्क, कनेरकरनगर, फुलेवाडी, संभाजीनगर, रायगड कॉलनी या उपनगरांची रचना उंचसखल असल्याने नागरी वस्तीत पावसाचे दुर्गंधीयुक्त पाणी या भागात शिरते. कचरा उठावातील अनियमिततेने रस्त्यावर पसरलेला कचरा, अस्वच्छ स्वच्छतागृहे, गटारीअभावी रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, घनकचऱ्यानी तुंबलेले नैसर्गिक नाले यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला डासांचे प्रमाणात वाढ होऊन साथीच्या रोगांचा फैलाव होतो.
आधीच कोरोनाच्या महामारीने नागरिक त्रस्त असतानाच ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलचा साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक चिंतेत आहेत. गढूळ पाण्यामुळे गतवर्षी उपनगरात अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. साथीच्या रोगांबाबतच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना आखतानाच या साथीबाबतीत पालिका आरोग्य विभागाने तेवढीच जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. पण पालिकेचा संबंधित आरोग्य विभागच या मोहिमेपासून कोसोमैल दूर असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी कळंब्यात डेंग्यूने मोठे थैमान घातले होते. ज्यात तीन जणांनी जीव गमावला. तर उपनगरात पाच नागरिक डेंग्यूची शिकार झाले होते.
त्यामुळे किमान यावर्षी तरी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, कचरा उठाव व औषध फवारणीत नियमितता ठेवत नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सशक्त ठेवावे ही मागणी जोर धरत आहे.
चौकट
लोकप्रतिनिधी अनुत्साही
नगरसेवकांची मुदत संपल्याने पालिकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून इच्छुक उमेदवारांची प्रभागात औषध फवारणीची मोहीम सुरू आहे. पण, कचरा उठाव, नालेसफाईची कामे लोकप्रतिनिधीअभावी परिणामकारक होत नसल्याचे उपनगरात चित्र आहे.