कोल्हापूर : कोरोनाची साथीने थैमान घातल्यानंतर आता डेंग्यू, चिकनगुनियाच्या साथीनेही डोके वर काढण्यास सुरू केले आहे. विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातही या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद जिल्हा हिवताप आणि महापालिका आरोग्य विभागाकडे झाली आहे.कोरोनाची दुसरी लाट येणार असे गृहीत धरून प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त असतानाच डेंग्यू, चिकनगुनिया साथीचा उद्रेक होताना दिसून येत आहे. शिरोळमध्ये डेंग्यूसदृश आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून साथीचा उद्रेक असणाऱ्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.
सर्व्हेक्षण मोहीम, धूर, औषध फवारणी, जनजागृती केली जात आहे. तसेच कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सर्व्हेक्षणासाठी १० कर्मचारी, तर प्रत्येक प्रभागात धूर फवारणीसाठी दोन कर्मचारी नियुक्त केले आहे.
कोरोनामुळे नागरिकांनी ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशा किरकोळ लक्षणे असताना दवाखान्यात जाणे टाळले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या यंदा कमी दिसून येत असली तरी प्रत्यक्षात रुग्णसंख्या जादा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच प्रशासनाकडे सर्वच रुग्णांची नोंद होत नाही, हेही वास्तव आहे.शहरात डेंग्यूचे ४४७ रुग्णशहरामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे ४४७ रुग्ण झाले आहेत. गेल्या महिन्याभरात २५ रुग्ण नवीन आढळले. याचबरोबर महिन्यात चिकनगुनियाच्या १३ रुग्णाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात १७६ जणांना डेंग्यू झाला असून चिकनगुनियाचे ९९ रुग्ण आहेत.
प्रशासनाकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे आवश्यक आहे.- डॉ. विनोद मोरेजिल्हा हिवताप अधिकारी