कोल्हापूर : आदिवासी कोळी समाजासह ३३ जमातींच्या बळावर आजवर सगळे पक्ष सत्ता उपभोगत आहेत, निवडून येताना समाज हवा असतो आणि निवडून आले की यांना बोगस आदिवासी दिसतात. असा प्रकार आता चालणार नाही. आता आम्ही सुशिक्षीत झालो आहोत, आम्हाला कोणी फसवू शकणार नाही बऱ्याबोलानं अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या नाही तर मुंबईला धडक मारून हिसकाऊन घेऊ कोल्हापुरात पडलेली ही ठिणगी राज्यभर पेटवू असा इशारा देत आज, बुधवारी कोळी समाज बांधवांनी आक्रोश मोर्चाद्वारे सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला.कोल्हापुरातील टाऊन हॉल येथून आक्रोश मोर्चाचा सुरुवात झाली. डोक्यावर मी आदिवासी लिहलेल्या टोप्या घालून समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या मध्यभागी आदिवासी वेशभूषा केलेले कार्यकर्ते व हा प्रश्न सभागृहात मांडलेले आमदार गोपीचंद पडळकर, रमेशदादा पाटील उपस्थित होते. मोर्चातील अनुसुचित जाती जमातीचा तिसरा डोळा महादेवाचा जागा करू नका त्याला, दैव आमचा समाजाचा विनाश करेल तुम्हा सर्वांचा, रबर ताणाल झटका बसेल...आम्हाला ताणाल फटका बसेल, क्रांतीशिवाय पर्याय नाही आता आम्ही शांत बसणार नाही, आम्ही मागताये काय अनुसुचित जमातीचे दाखले तुम्ही देताय काय काहीच नाही हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.
बऱ्याबोलानं अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा...; कोल्हापुरात कोळी समाजाचा आक्रोश मोर्चा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 25, 2023 4:59 PM