कोल्हापूर : तब्बल दहा दिवसांनी कोविशिल्ड लस आली खरी; पण महापालिका आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले त्यांना लस घेण्याबाबत फोन केले जातील, असे सांगितले गेले. पण केंद्रातून फोनही गेले नाहीत आणि केंद्रावर गेल्यावर योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारी काही केंद्रांवर कर्मचारी, नागरिक यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.
बऱ्याच दिवसांच्या तुटवाड्यानंतर कोविशिल्ड लस कोल्हापुरात उपलब्ध झाली. शासकीय नियमाप्रमाणे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्यांची संख्याही वाढली आहे. लसीचे सात हजार डोस प्राप्त झाले, परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य नियोजन झाले नाही. नागरिकांपर्यंत प्रशासनाचे नियोजन पोहोचले नाही. त्यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला. पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ ते १०० दिवस पूर्ण झाल्यामुळे लस मिळेल की नाही, याची चिंता लागून राहिली होती. नागरिक मोठ्या अपेक्षेने येऊन पहाटेपासून रांगेत उभे राहिले होते. नागरिकांनी आपापले क्रमांकही ठरविले होते. चार-पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना आज लस मिळणार नाही, असे कर्मचारी सांगायला लागले. तेव्हा नागरिकांच्या संतापात भर पडली.
लस नेमकी कोठे घ्यायची?
नागरिकांना गुरुवारी कर्मचाऱ्यांनी ताकतुंबा केल्याचे निदर्शनास आले. लस मिळत नाही म्हणून घरापासून लांबच्या अंतरावर जाऊन पहिला डोस घेतला. आता घराजवळील केंद्रावर दुसरा डोस घ्यायला नागरिक गेले तेव्हा त्यांना तुम्ही पहिला डोस घेतला तेथे जावा असे सांगण्यात आले. तेथे गेल्यावर त्यांना सीपीआर रुग्णालयात जावा असे सांगण्यात आले. हेलपाटे मारेपर्यंत लस संपल्याचे त्यांना समजले. त्यामुळे नागरिकांनी नेमकी कोठे लस घ्यावी? हाही एक प्रश्न गुरुवारी निर्माण झाला.
-भाजपकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी-
सकाळपासून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत भाजपाचे अजित ठाणेकर, विजय अग्रवाल, विराज चिखलीकर, सुनील पाटील, विशाल शिराळकर यांनी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी तक्रारी खऱ्या असल्याचे त्यांच्या लक्षत आले. त्यामुळे कार्यकर्ते फिरंगाई केंद्रात गेले. तेथे त्यांनी उपायुक्त निखिल मोरे यांना बोलवा, अशी मागणी नोडल ऑफिसर प्रशांत पंडित यांचेकडे केली. उपायुक्त येईपर्यंत आम्ही केंद्र सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. थोड्याच वेळात उपायुक्त आले. त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला व ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
लसीकरणाचे नियोजन पूर्णपणे चुकल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सामान्य नागरिकांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती न पोहोचणे, केंद्रांवर याद्या उशिरा येणे आणि फोन न होणे हेच गोंधळाचे कारण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा तपशील आणि अन्य सूचना आदले दिवशी दुपारपर्यंत जाहीर कराव्यात व त्याचे व्हिडिओ बुलेटिन करावे, अशी सूचना केली. या वेळी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, केंद्रप्रमुख डॉ. भिसे उपस्थित होते.
(सूचना - फोटो ओळी स्वतंत्र देतो)