कोल्हापूर : बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठीच्या जाचक आटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापाालिकेसमोर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीच्यावतीने आक्रोश आसुड आंदोलन करण्यात आले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम कामगार महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना कामगार असल्याबाबतची नोंदणी महापालिकेकडे करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नोंदणी कामगारांच्या मुलांना महामंडळाच्या योजनेतून शिक्षण, विवाहचा खर्च शासन देते. तसेच कामगारांच्या दवाखाण्याचाही खर्च केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंद असणे आवश्यक आहे.
शहरी भागातील कामागारांची नोंद महापालिकेकडे केली जाते. महापालिकेने यासाठी जाचक आटी घातल्या आहेत. त्यामुळे कामागार योजनेपासून वंचित आहेत. नोंदणी कशा पद्धतीने केली जाते याची माहिती कामगारांना नाही. तसेच विभागीय कार्यालयामध्ये अधिकारी जागेवर उपस्थित नसतात. त्यामुळे फेऱ्या मारण्याची वेळ त्यांच्यावर येते.
त्यामुळे शहरातील सर्व कामगारांची नोंदणी चार विभागीय कार्यालयामार्फत न करता एका ठिकाणीच संयुक्त पद्धतीने व्हावी. नोंदणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपशहर अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी गुणवंत नागटिळे, अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे, रवि पाटील, रामा मुल्ला, रविंद्र कांबळे, विजया क्षीरसागर, प्रकाश पवार, अनिल जाधव उपस्थित होते.