शिवाजी सावंत, लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी: आकुर्डे-महालवाडी (ता.भुदरगड) दरम्यानच्या "कुरण'नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी अमावस्येच्या रात्री तीन ते चार प्रेमवीरांनी बाभळीच्या झाडावर युवतींचे फोटो, दाभण, बिब्बे, लिंबू लावून अघोरी जादूटोणा करून इच्छित तरुणीला वश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.
आकुर्डे-महालवाडी दरम्यान दहा एकराच्या विस्तीर्ण माळरानावर केवळ एकच बाभळीचे झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू आणि दाभण मारलेले आढळले.काळ्या बाहुल्याही अडकवलेल्या होत्या. त्यापैकी एका बाहुलीवर युवतीचा फोटो होता.तर एका युवतीच्या आई,वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार गुरुवारी अमावस्येच्या मध्यरात्री घडला आहे.
महालवाडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने पाच तारखेला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुरण माळावर मैदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला.या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.विज्ञानाच्या युगात अशा अंधश्रद्धेच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी भेट देऊन या घटनेचा निषेध नोदवला.तेथील सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावली. यामध्ये अंनिस तालुका अध्यक्ष अमोल थडके,महिला सहभाग विभाग प्रमुख प्रा.ज्योती थडके,अनिस कार्यकर्ते रितेश चौगले,गुरुनाथ चौगले,हर्षवर्धन कोराणे,पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता.
राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही भुदरगड तालुक्यात वारंवार अघोरी प्रकार घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनां मागील अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूटोणा विरोधी कायदा याविषयी जनजागृती करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. - अमोल थडके (तालुकाध्यक्ष,अंधश्रध्दा निर्मुलन समिती भुदरगड)
दरम्यान याबाबत प्रेमवीरांचा शोध घेऊन त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदेंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.या मागणीचे निवेदन पुरोगामी विचार मंच, भुदरगड यांच्यावतीने उपनिरीक्षक योगेश गोरे यांना देण्यात आले.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजेंद्र यादव, कॉ.सम्राट मोरे,मच्छिंद्र मुगडे,के.के.भारतीय, संतोष कडव यासह पुरोगामी विचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. युवतींच्या ड्रेसची बटणेही... काळ्या बाहुल्या बरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले होते. दाभणामध्ये युवतींच्या ड्रेसची बटने काळ्या दोऱ्यामध्ये अडकलेली होती.या अघोरी प्रकारामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.