कोल्हापूर : पहिल्या पावसाच्या सरी आणि उच्चशिक्षण व आपल्या करिअरच्या ओढीने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अलोट गर्दीत लोकमत आयोजित अॅस्पायर शैक्षणिक प्रदर्शनाची सांगता झाली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला नवनवीन क्षेत्रांतील करिअर संबंधीची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. दहावी-बारावीसारख्या आयुष्याच्या मुख्य वळणावर असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या नव-नव्या संधी धुंडाळता याव्यात त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील शिक्षणाची माहिती मिळावी या उद्देशाने ‘लोकमत’च्यावतीने अॅस्पायर शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तीन दिवस व्याख्याने, स्पर्धा, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे रंगलेल्या शैक्षणिक मेळ््याची सोमवारी तितक्याच उत्साहाने सांगता झाली. गेले तीन दिवस शिक्षणाच्या मंदिराचा आभास व्हावा अशारितीने या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. रोबोटिक्स कार्यशाळा, ‘अभियांत्रिकीमधील करिअर संधी’ ‘दहावीनंतर विज्ञान शाखेतील संधी’ कौशल्यवृद्धीतून समृद्धी’ ‘करिअर इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’ ‘इंटरव्ह्यू स्किल्स ‘हाऊ टू रिच दि टॉप, ‘करिअर कसे निवडावे’, मीट द टॉपर सेमिनार, ‘न्यू एज लर्निंग वुइथ टेक्नॉलॉजी’ अशा विविध विषयांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना योग्य करिअर कसे निवडावे यावर मार्गदर्शन मिळाले. याशिवाय सायन्स पंडित (सामान्यज्ञान स्पर्धा), कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांमधील सामान्यज्ञान आणि विज्ञान यातील कौशल्य पणाला लावली. दिवसभर झालेल्या विविध स्पर्धा आणि व्याख्यानांना हजेरी लावत विद्यार्थ्यांनी स्टॉलवर जाऊन संस्थांची माहिती घेतली. दुपारी तीनच्या दरम्यान ढग दाटून येत पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसामुळे उत्साहात खंड पडला नाही. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. गर्दीमुळे स्टॉलधारकांना विद्यार्थ्यांना माहिती सांगताना वेळ अपुरा पडत होता. प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल सर्व शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलधारकांचा ‘लोकमत’च्यावतीने सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)ट्रेंड नको, पाल्याचे उपजत गुण ओळखा कोल्हापूर : पाल्याच्या करिअरसाठी शिक्षणक्षेत्रातला ट्रेंड पाहू नका. जन्मत: प्रत्येक मनुष्याला काही उपजत गुण असतात. या गुणांचा विचार करिअर निवडीसाठी व्हावा, असे प्रतिपादन मनालया कौन्सिलिंग सेंटरचे प्रोप्रायटर चारुदत्त रणदिवे यांनी केले. ‘लोकमत’तर्फे ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये आवड आणि बुद्धिमता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. पाल्यांनीही स्वत:मधील कौशल्य ओळखले पाहिजे. चांगले गुण असले म्हणजे विज्ञान शाखाच निवडली पाहिजे हा समज चुकीचा आहे. दरवर्षी लाखो इंजिनिअर्स, डॉक्टर्स बाहेर पडतात, पण यापैकी कि तीजण बाजाराच्या कसोटीस उतरतात, याचा विचार आवश्यक आहे. बाजारात असंख्य संधी आहेत, पण या संधीतील नेमकी कोणती संधी पाल्याच्या कौशल्यास न्याय देऊ शकते, याची चाचपणी महत्त्वाची आहे. त्यासाठी जन्मजात गुण, बलस्थाने, ज्ञान आत्मसात करण्याच्या पद्धती, आदी निकषांवर पाल्यांची चाचणी करून करिअरचा मार्ग निवडावा. (प्रतिनिधी)‘सायन्स पंडित’ स्पर्धा उत्साहात लोकमत बालविकास मंच व चाटे स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स पंडित’ या सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित ५० प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतून एकच विजेता निवडला जाईल. विजेत्याला रोख रक्कम रुपये पाच हजारांचे बक्षीस देण्यात येईल; तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण लवकरच करण्यात येईल.ई-लर्निंगसाठी रोबोमेट प्रणाली प्रभावी : सिंग कोल्हापूर : आॅडिओ व्हिज्युअल लर्निंगसाठी महेश ट्युटोरियल्सने रोबोमेट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली आहे. अकरावी - बारावी विज्ञान शाखेच्या आणि आयआयटी व मेडिकलच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रणाली अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ‘महेश ट्युटोरियल्स लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुरेंद्र सिंग यांनी केले. ‘लोकमत’तर्फे राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे शनिवार (दि. १३)पासून सुरू असलेल्या ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा सोमवारी समारोप झाला. समारोपाच्या सत्रात ‘न्यू एज लर्निंग वुईथ टेक्नॉलॉजी’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. सिंग बोलत होते. डॉ. सिंग म्हणाले, महेश ट्युटोरियल्सची रोबोमेट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ही आॅडिओ व्हिज्युअल शिक्षणप्रणाली आहे. यामध्ये तज्ज्ञ शिक्षकांची आॅडिओ - व्हिडीओ लेक्चर रेकॉर्ड केली आहेत. दहावी-बारावी आणि आयआयटीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी, अभ्यासक्रमासाठी ही सिस्टीम अतिशय उपयुक्त आहे. सॅमसंगच्या टॅबलेटमध्ये रोबोमेट डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे टॅबलेटद्वारे विद्यार्थी घरी बसूनही अभ्यास करू शकतात. रोबोमेटच्या माध्यमातून सॅमसंग मोबाईलद्वारे दुसऱ्या दिवशी शिकवण्यात येणाऱ्या पाठातील व्हिडीओ आदल्या दिवशी पाहण्याची आणि त्यावर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ चाचणी देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाचणीत मिळालेले गुण, बरोबर आणि चुकीचे उत्तरे, बरोबर उत्तर आलेल्या प्रश्नाची उकल, आदी सुविधाही रोबोमेटमध्ये आहे. उजळणीच्या दृष्टीने रोबोमेट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही डॉ. सिंग यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
अलोट गर्दीत लोकमत अॅस्पायर प्रदर्शनाची सांगता
By admin | Published: June 16, 2015 1:10 AM