म्हालसवडे : म्हालसवडे ( ता. करवीर) येथे ग्रामपंचायत व कोरोना दक्षता कमिटी यांच्यावतीने कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्याकरिता कडक निर्बंधांचे नियोजन केले आहे . सिक्युरिटी फोर्स व आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने या साथीला रोखण्यासाठीची अंमलबजावणी सुरू केली असून बाहेरील लोकांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचेही याकामी सहकार्य लाभत आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गावाबाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय गावातील नागरिकांनाही बाहेर सोडले जात नाही. गेले दोन दिवस सिक्युरिटी फोर्समार्फत विनाकारण गावात फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या येथे एकच सक्रिय रुग्ण गृह अलगीकरण कक्षात आहे. शिक्षक, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत गावात सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे. सर्व्हेमध्ये आढळणाऱ्या किरकोळ आजारी रुग्णांवर तात्काळ ग्रामपंचायतीमार्फत उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती दक्षता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली. यावेळी सरपंच संदीप कांबळे, शंकर पाटील, एकनाथ वरुटे, आरोग्य सेवक किरण भाट, सुजाता पाटील उपस्थित होते.