कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला श्री वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडून सन २०१९-२० साठीचा ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासासाठीचा हा नववा तर एकूण ६२ वा पुरस्कार आहे. यामुळे शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गळीत हंगाम २०१९-२०मध्ये कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे राबविलेल्या ऊस विकास योजना व त्याची काटेकोर अमंलबजावणी याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. विक्रमसिंहजी घाटगे यांनी ३० वर्षांपूर्वी कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे पर्यायाने सभासदांचे उत्पादन वाढावे म्हणून कारखान्यांमध्ये स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला. या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांसाठी विविध ऊस विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी भरीव अनुदानाची तरतूदही करण्यात आली आहे, त्याचेच हे फलित आहे.
○ चौकट
कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले की, विक्रमसिंह घाटगे यांनी बदलत्या परिस्थितीत कारखाना सक्षमपणे कसा चालवावा, ही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याप्रमाणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. सभासद, ऊस उत्पादक कामगार व हितचिंतक यांचा यात मोलाचा वाटा आहे.
○ कृपया समरजितसिंह घाटगे यांचा सिंगल फोटो वापरावा ही विनंती.