शिरोळ : आपल्यातील रोगप्रतिकारशक्तीला न ओळखता येणारी विकृती म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग आहे. कोरोनाबद्दल समजऐवजी गैरसमजच जास्त असल्याने कोरोनाची अनाठायी भीती निर्माण झाली आहे. कोरोना हा मानवनिर्मित आजार नसून तो एक प्रकारचा विषाणू आहे. सकारात्मक विचार आणि मानसिक संतुलन ठेऊन कोरोनावर मात करता येते, असे प्रतिपादन संशोधक डॉ. अमोल आचरेकर यांनी केले.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सभागृहात डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्यावतीने सरपंच परिषदेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.
वसंतराव हंकारे यांनी आपल्यातील मरगळ झटकून आपली योग्य प्रतिमा तयार करून आपल्यातील खरा बाणेदारपणा दाखवून आनंदी जीवन जगावे, असे सांगितले. मंगलमय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी उपस्थितांना प्रात्यक्षिक करण्यास सांगून व्यायाम करून घेतला.
स्वागत मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना तर, प्रास्ताविक चेतन सूर्यवंशी यांनी केले. या वेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, अशोक शिंदे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सर्जेराव शिंदे, अशोकराव कोळेकर, शेखर पाटील, महेंद्र बागी, दरगू गावडे, धनाजी पाटील-नरदेकर, मिनाज जमादार, शक्तिजीत गुरव, डॉ. रेखा शेरेबेड उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत कलगी तर ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.
फोटो - ०८०६२०२१-जेएवाय-१०
फोटो ओळ - शिरोळ येथे सरपंच परिषदेत डॉ. अमोल आचरेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, एम. व्ही. पाटील उपस्थित होते.