राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वय वर्षे २१ ते ३० या गटांमध्ये १७.३५ टक्के, तर वय वर्षे ३१ ते ४० या गटात २१.९६ इतके आहे. त्यामध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या, विविध स्वरूपांतील रोजगार करणाऱ्या तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूरमध्ये २१ ते ५० वर्ष वयोगटांत अधिक रुग्ण आहेत. त्यातील कोरोनावर मात केलेल्या काही युवक-युवतींसमवेत ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यांनी कोरोनावर कशा पद्धतीने मात केली हे जाणून घेतले.
सकारात्मक राहिलो
खोकला, ताप आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तेथून पुढे सीपीआरमध्ये उपचार घेतले. यापूर्वी कोरोनाचे रुग्ण पाहिले असल्याने कोणतेही दडपण, भीती घेतली नाही. सकारात्मक दृष्टीने कोरोनाचा सामना केला असल्याचे रंकाळा परिसरातील युवकाने सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. लवकर उपचार घेऊन पुरेशी विश्रांती घ्यावी, असा सल्ला त्याने दिला.
दुखणं अंगावर काढू नका
दोन दिवस ताप कमी झाला नसल्याने तातडीने तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यावर वेळेत उपचार घेऊन कोरोनावर मात केली असल्याचे गोकुळ शिरगांव (ता. करवीर) येथील तरुणाने सांगितले. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ताप, खोकला, आदी दुखणं अंगावर काढू नका. त्यावर वेळीच उपचार घ्या. कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:ला त्यांच्यापासून दूर ठेवा, असे आवाहन त्याने केले.
योग्य उपचार घेतले
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर मी पहिली चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. मात्र, सात दिवसांनंतरची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर वेळेत आणि योग्य उपचार घेतले. रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा आहार, वाफ घेण्यासारखे घरगुती उपचारही केल्याने कोरोनामुक्त झाल्याचे कोल्हापुरातील युवतीने सांगितले. कोरोनाच्या सद्य:स्थितीत तरुणाईने स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, आदी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तिने केले.