लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गतवर्षी कोविडचे संकट असतानाही त्यावर मात करत वारणा सहकारी बँकेने तब्बल १९ कोटी ७५ लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळविल्याची माहिती अध्यक्ष निपुण कोरे यांनी दिली. कोरोनामुळे अस्वस्थ समाजमन, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, ग्राहकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली असतानाही लोकांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासामुळेच हा टप्पा गाठू शकलो, अशा भावना कोरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
बँकेने बहुराज्य दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण केले असून कर्नाटकातील एक बँक समाविष्ट करून घेऊन लवकरच बहुराज्य दर्जा प्राप्त करणार आहे. बँकेच्या नफ्यातून कर्मचाऱ्यांसाठी १५ टक्के सानुग्रह अनुदानाची तरतूद केली आहे. सभासदांना लाभांशाची तरतूद करून वार्षिक सभेपुढे मंजुरीसाठी शिफारस केली आहे. बँकेच्या वारणा महाविद्यालयातील विस्तारीत काैंटरसह ४० शाखा आहेत. सर्व शाखा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्या आहेत. कॅशलेस व्यवहार करण्याकडे बँक प्रयत्नशील आहे. लवकरच बीबीपीएस, टेलिफोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, युपीआयद्वारे सर्वप्रकारचे पेमेंट, इंटरनेट बँकिंग अशा सुविधा ग्राहकांना देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या या वाटचालीत उपाध्यक्ष उत्तम पाटील, सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ, सरव्यवस्थापक प्रकाश डोईजड, हेमंत बोंगाळे, उपसरव्यवस्थापक पी. टी. पाटील यांचेही योगदान राहिले.
बँकेच्या यशस्वी वाटचालीत सभासदांचा विश्वास व पाठबळ मोठे आहे. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या बँकेच्या माध्यमातून सर्वच थरांतील लोकांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू
निपुण कोरे
अध्यक्ष
वारणा सहकारी बँक लिमिटेड
दृष्टिक्षेपात बँक
एकूण ठेवी : ९३८ कोटी
एकूण कर्जे : ५९८ कोटी
एकूण व्यवसाय : १५३६ कोटी
सीडी रेशो : ६४ टक्के
ढोबळ नफा : १९.७५ कोटी
एकूण शाखा : ४० व एटीएम : ३७