कोल्हापूर : केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने पाटाकडील तालीम मंडळावर १-० अशा गोल फरकाने मात केली, तर कोल्हापूर पोलीस संघाने संध्यामठ तरुण मंडळावर ४-० अशा गोल फरकाने मात केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यामध्ये झाला. पहिल्या मिनिटापासूनच कोल्हापूर पोलीस संघाने सामन्यावर पकड निर्माण केली. कोल्हापूर पोलीस संघाच्या ताहिद मालदीने पाचव्या मिनिटाला गोल करीत सामन्यावर पकड निर्माण केली. ही आघाडी कमी करण्यासाठी संध्यामठ तरुण मंडळाकडून आशिष पाटील, विराज साळोखे, संदेश पाटील, स्वराज्य सरनाईक यांनी खोलवर चढाया केल्या; मात्र त्यांना अपयश आले. मध्यंतरापर्यंत सामन्यात कोल्हापूर पोलीस संघ १-० अशा गोल फरकाने आघाडीवर होते.
उत्तरार्धात कोल्हापूर पोलीस संघाकडून ६३ व्या मिनिटाला सागर भोसलेने गोल नोंदवीत सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी घेतली. या गोलनंतर पोलीस संघाचा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांनी खोलवर चढाया करीत सामन्यावर पकड निर्माण केली. यामध्ये ८० व्या मिनिटाला ताहिद मालदीने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदविला. अतिरिक्त वेळेमध्ये पुन्हा एकदा ताहिदने वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल नोंदवीत सामन्यावर ४ - ० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये झाला. दोन्ही संघांनी सामन्याच्या प्रारंभापासून खोलवर चढाया करीत सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाटाकडील तालीम संघाकडून ओंकार जाधव, ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे-पाटील, तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने रोहित मंडलिक, मिर्चेल, राजादास, प्रतीक सावंत, अक्षय मंडलिक यांनी खोलवर चढाया करून संघाचे खाते उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले; मात्र त्यांना अपयश आले. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता.
उत्तरार्धात फुलेवाडी संघाने आक्रमक खेळी करीत पाटाकडील तालीम मंडळाची बचाव फळी भेदण्यास सुरुवात केली. यामध्ये फुलेवाडी संघाच्या मिर्चेलने उत्क ष्टरीत्या गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर फुलेवाडी संघाने अधिकच आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली.
यामध्ये रोहित मंडलिक, राजादास यांनी जोरदार चढाया केल्या; मात्र त्यांना अपयश आले. सतत होणारे आक्रमण रोखण्यासाठी पाटाकडील तालीम मंडळाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये ओंकार जाधव, ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे - पाटील यांनी फुलेवाडी संघाची बचाव फळी भेदण्यास सुरुवात केली; मात्र त्यांना अपयश आले. फुलेवाडी संघाची ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.