कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी आता ५० टक्क्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी जवळपास रोज ४ हजार सिलिंडर ऑक्सिजनची मागणी होत होती, ती कमी होऊन आता १६०० ते १७०० पर्यंत आली आहे. दुसरीकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडदेखील बऱ्याच प्रमाणात शिल्लक असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
कोल्हापुरात कोरोना दुसऱ्या लाटेचा संसर्ग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रुग्णसंख्या इतक्या झपाट्याने वाढू लागली की, हा हा म्हणता सगळे रुग्णालये फुल्ल झाली. कोविड केअर सेंटर सुरू करावे लागले, तेदेखील पूर्ण क्षमतेने भरले. दुसरीकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे या दोन्ही प्रकारचे बेड वाढवण्यात आले. तरीदेखील रुग्णांना बेड मिळत नव्हते. रेमडेसिविर इंजेक्शनचा तर काळाबाजार सुरू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रोज ३० ते ३५ टन इतक्या ऑक्सिजनची मागणी होती ती वाढून दुसऱ्या लाटेत ५२ टनांपर्यंत गेली. मे महिन्यात तर १० दिवस असे होते की, रुग्णालयांमध्ये काही तास पुरेल इतके ऑक्सिजन शिल्लक असायचे. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती सांभाळून घेत वेळ निभावून नेली. दरम्यान, मुंबई-पुण्यातील लाट आटोक्यात आल्याने कोल्हापुरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला.
दुसऱ्या लाटेचा मोठा संसर्ग होता त्या काळात जिल्ह्यासाठी रोज ४ हजारांवर ऑक्सिजन सिलिंडर लागायचे. आता हे प्रमाण कमी होऊन १६०० ते १७०० वर आले आहे. ऑक्सिजनचे व व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक आहेत. बेड आणि रेमडेसिविर इंजेक्शनसाठी स्वतंत्र वॉर रूम कार्यरत असून, तेथे आता चौकशीसाठी येणारे दूरध्वनीदेखील कमी झाले आहेत. दिवसभरात एक-दोन फोन व्हेंटिलेटर बेडच्या चौकशीसाठी येतात. तर ज्या रेमडेसिविरसाठी नागरिकांना धावाधाव करावी लागायची त्या इंजेक्शनचा आता मागणी तसा पुरवठा होऊ लागला आहे. उलट रुग्णालयांकडूनच त्याची मागणी कमी झाली आहे. जिल्ह्यात अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरू असली तरी ऑक्सिजनची घटलेली मागणी आणि शिल्लक राहत असलेले बेड हे त्यातल्या त्यात दिलासादायक चित्र आहे.
---
बेडची उलब्धता पुढीलप्रमाणे (मंगळवारी सायंकाळी ६ वाजता )
बेडचा प्रकार : क्षमता : वापरात असलेले बेड : शिल्लक बेड
साधे बेड : ४ हजार ९४१ : २ हजार ८६८ : २ हजार ७३
ऑक्सिजन बेड : २ हजार ६९४ : २ हजार ८९ : ६०५
व्हेंटिलेटर बेड : ५५६ : ४७८ : ७८
----