कोल्हापूर : महाराष्ट्रातून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस बुधवारी सकाळीच विशाखापट्टणम येथे पाेहोचली असून, ती ऑक्सिजनचे भरलेले टँकर घेऊन कोल्हापूरकडे रवानाही झाली आहे. तब्बल १२०० किलोमीटरचे अंतर पार करून ती येणार असल्याने साधारणपणे २१ तासांचा कालावधी गृहीत धरला तर ती आज, गुरुवारी दुपारनंतरच कोल्हापुरात पोहोचणार आहे.
राज्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून रेल्वेने ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. ११० टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या या एक्सप्रेसमधील २६ टँकर कोल्हापुरात उतरविले जाणार आहेत. यासाठी धक्का तयार करण्याची प्रक्रिया बुधवारी मार्केट यार्डातील रेल्वे गुड्स येथे युद्धपातळीवर सुरू होती. मिरज जंक्शन येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम केले जात आहे. लष्कराच्या मदतीने हे टँकर उतरविण्याचे काम करवून घेतले जाणार आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारमार्फत रेल्वेकडे विशाखापट्टणम येथून द्रवरूप ऑक्सिजन आणण्याची परवानगी मागितली होती. दोन दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्यानंतर तातडीने यंत्रणा कामास लागली असून, बुधवारी सकाळीच रेल्वे आंध्रप्रदेशात पोहोचली आहे. तेथे टँकर भरून तयार असल्याचे ऑनलाईन दिसत आहे. विशाखापट्टणम, हैदराबाद, मिरजमार्गे ही एक्सप्रेस कोल्हापुरात येणार आहे. हे अंतर १२०० किलोमीटर असल्याने याला संपूर्ण एक दिवस नऊ तासांचा कालावधी लागतो. मध्येच पासिंगचा व्यत्यय आला तर हा वेळ आणखी वाढणार आहे. त्यामुळे किमान २१ तास गृहीत धरले तर आज, गुरुवारी दुपारनंतर रेल्वे यार्डात येण्याच्या हालचाली सुरू होऊन संध्याकाळी अथवा रात्री रेल्वे प्रत्यक्षात येईल. तेथून ते टँकर उतरवून घेण्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र धक्क्यावर उतरवून घेऊन ते पुढे अन्य जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत.
चौकट ०१
जिल्हा प्रशासन अनभिज्ञ
ऑक्सिजन घेऊन येणारी एक्सप्रेस कधी येणार आहे, किती टँकर असतील, ते उतरवून घेऊन पुढे कुठे पाठवणार याबाबतची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. रेल्वेकडून याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने बऱ्यापैकी संभ्रमाचे वातावरण आहे.