यड्राव : येथील महालक्ष्मी ऑक्सिजन गॅस प्रकल्पाला गुरुवारपासून लिक्विड गॅस पुरवठा बंद झाल्याने ऑक्सिजननिर्मिती बंद झाली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजननिर्मिती बंद पडत असल्याने शासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
तीन दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी या महालक्ष्मी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाला भेट देऊन त्याची माहिती घेतली व लिक्विड गॅस पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन सर्वांनी दिले होते. या आश्वासनानंतर दोन दिवसांतच गुरुवारी संध्याकाळपासून या प्रकल्पाला लिक्विड गॅसपुरवठा बंद झाला आहे. तो शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू झाला नसल्याने व शनिवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता असल्याने सुमारे चाळीस तासांहून अधिक काळ हा प्रकल्पातील ऑक्सिजननिर्मिती बंद राहणार आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन चार टन ऑक्सिजननिर्मिती होते. लिक्विड गॅसचा पुरवठा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असतो. सध्या बल्लारी कर्नाटक येथून लिक्विड गॅस पुरवठा होतो; परंतु लिक्विड गॅसअभावी नागाव व कणेरीवाडी येथील प्रकल्पातील ऑक्सिजननिर्मिती बंद आहे, तर कालपासून येथील प्रकल्पातून ऑक्सिजननिर्मिती बंद आहे. कोरोना महामारीच्या काळात क्षणाक्षणाला ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी व कागल येथील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पावर याचा ताण वाढला आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव, ऑक्सिजनची वाढती मागणी व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी लोकप्रियतेसाठी आश्वासन देतात; परंतु प्रत्यक्ष त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने या कोरोनाच्या काळात हे दुर्लक्ष रुग्णाच्या जिवाशी खेळते हे दुर्लक्षित करून चालणार नाही.