नसीम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखर कारखाने ऑक्सिजन निर्मिती करू शकतात; पण सद्य:स्थितीत त्याला लागणारा कालावधी व तांत्रिक बाजू पाहता सॅनिटायझर निर्मितीएवढी ऑक्सिजन प्रकल्प काढण्याची प्रक्रिया सोपी नाही. परदेशातून यंत्रसामग्री मागविण्यापासून सुरुवात करावी लागणार असून, प्रत्यक्षात निर्मिती सुरू होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. शिवाय वाढीव ऑक्सिजनची मागणी तात्कालिक असल्याने कायमस्वरूपी गुंतवणूक करण्याबाबत साखर कारखानदार साशंक असल्याचे दिसत आहे.
आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवत असल्याने आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ऑक्सिजन मागवून घेतला जात आहे. रेल्वे, विमानाने टँकर मागविले जात आहेत. यावरून देशभरासह राज्यातही हाहाकार उडत असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील १९० साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीत उतरावे, असे आवाहन शुक्रवारी केले. अशी निर्मिती कितपत तातडीने शक्य आहे हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. साखर कारखानदार ऑक्सिजन तयार करू शकतात; पण सध्या मागणी एका दिवसावर, तासावर आली असताना, साखर कारखान्यांनी आता काम सुरू केले तर प्रत्यक्ष ऑक्सिजन उपलब्ध होण्यास किमान दोन महिने तरी लागतील. तेव्हा कोरोनाची व ऑक्सिजनचीही हीच परिस्थिती राहील हे आता कुणीही सांगू शकत नाही, त्यामुळे तयार झालेल्या ऑक्सिजनचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
चौकट ०१
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डिस्टिलरी असणाऱ्या साखर कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती केली; पण कोरोनाची लाट ओसरल्यानंतर याची मागणी कमी झाल्याने शिल्लक साठ्याचे करायचे काय, असा मोठा प्रश्न साखर कारखानदारांसमोर उभा ठाकला होता.
चौकट ०२
राज्यात ११० साखर कारखान्यांकडे डिस्टिलरी प्रकल्प आहेत. त्यातील बहुतांश डिस्टिलरी या हंगामी आहेत. जास्त दिवस हंगाम घेणाऱ्या कारखान्यांच्याच डिस्टिलरी पूर्ण क्षमतेने चालतात. आता ऑक्सिजनचा १० टनाचा एक प्रकल्प तयार करायचा म्हटला तरी किमान १ कोटी रुपये खर्च होणार आहे. शिवाय यासाठी लागणाो तांत्रिक कर्मचारीही स्वतंत्रपणे इतर ठिकाणाहून मागवून घ्यावे लागणार आहेत, शिवाय हवेतून ऑक्सिजन तयार करणारी सर्व यंत्रसामग्री परदेशातून आयात करावी लागते. कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या अडचणी समोर आहेत.