लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात मंजूर केलेला २०० जम्बो सिलिंडरचा ऑक्सिजन प्रकल्प गांधीनगरला हलविण्यात आला. यापूर्वीही इचलकरंजीतील ड्युरा सिलिंडर पळविले होते, तसाच हा प्रकार असल्याचा खळबळजनक आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. परंतु आपला पाठपुरावा सुरू असून, लवकरच आयजीएममध्ये सर्व अत्यावश्यक सेवा, स्कॅनिंग मशीन तपासण्या यांसह अन्य सुविधा उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनमधून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयजीएम रुग्णालयासाठी २०० जम्बो सिलिंडर तयार करण्याचे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी ४०० सिलिंडरचा शेड उभारण्यात आला. परंतु इचलकरंजीला दुजाभावाची वागणूक देत दुसरा प्रकल्प येथून गांधीनगरला हलविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकल्प कोणत्या कारणाने हलविला, त्यामागे राजकारण आहे का, वारंवार इचलकरंजीला का डावलले जाते, असा प्रश्नही आवाडे यांनी उपस्थित केला.
सध्या रुग्णालयात सहा हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरू आहे. केंद्राकडूनही २१ हजार लिटरचा हा प्रकल्प मंजूर केला आहे. तो उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्राकडूनच आणखी एक २०० सिलिंडरचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ५५ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यातून सिटी स्कॅन मशीन, स्वतंत्र अद्ययावत अपघात विभाग, डायलेसीस सुविधा, अतिदक्षता विभाग अशा सर्व आरोग्य सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. हे रुग्णालय ३०० बेड्सचे करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. तसेच कोविडसह जनरल उपचारही याठिकाणी सुरू व्हावेत, यासाठी मागणी केली आहे. १ सप्टेंबरपासून ते सुरू होतील. ४२ कर्मचाऱ्यांचा विषयही निकाली निघाला आहे. त्यांना घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेस ‘ताराराणी’चे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.