कोल्हापूर : अतिशय अल्पावधीत सिध्दगिरी रूग्णालयामध्ये उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा दातृत्वाचे उत्तम असे प्रतीक आहे असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले. यावेळी पाटील यांच्या आवाहनानुसार १०० सिलिंडरसाठीही पाच लाखांची देणगी जमा झाली.कणेरी मठावर शनिवारी झालेल्या ऑक्सिजन प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गांधीनगरचे व्यापारी शंकर दुल्हाणी प्रमुख उपस्थित होते.कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ लागले. हीच गरज ओळखून चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धगिरी कणेरी मठावर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी देणगीचे आवाहन केले. त्याला लगेचच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
४३ लाख रूपये संकलित झाले आणि या लोकसहभागातून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र येथे तब्बल ५३ लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला.पाटील म्हणाले, कोरोनामुळे आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तात्पुरती सोय करण्याऐवजी वाढदिवसाच्या निमित्ताने हा संकल्प जाहीर केला आणि नागरिकांच्या दानशूरतेने तो तातडीने तडीसही गेला.
स्वामी काडसिध्देश्वर म्हणाले, त्याग आणि दान हे याला अतिशय महत्व आहे. पाटील यांनी यांनी त्यांच्या आयुष्यात या दोन घटकांना अधिक महत्व दिले आहे. त्यातून समाजाची सेवा होणार आहे. डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रेषम राजपूत यांनी आभार मानले.यावेळी या प्रकल्पाला सहकार्य करणारे श्यामसुंदर मर्दा, सुरेंद्र जैन, ललित गांधी, विनोद कंकाणी, अमित भिडे, माधवराव घाटगे, डॉ. प्रकाश गुणे, बंटी भांगडिया, विठ्ठलराव खोराटे, आप्पासाहेब मोहिते, सुनिल राजाराम अस्वले, रविंद्र कागवाडे, राहुल पाटील व आनंद पाटील -मुंबई, शेखर चरेगावकर, डॉ. रोंगे- पंढरपूर, भावेश पटेल, नरेश चंदवाणी, माणिक पाटील चुयेकर, प्रा. भारत खराटे, भाजपाचे जिल्हा संघटन सचिव नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.