कोल्हापूर : जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा शुक्रवारपासून दहा टनाने वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याहून पुरवठ्यात वाढ करण्यात आली असून आता जिल्ह्यासाठी ४५ टन ऑक्सिजन मिळत असल्याने जिल्हा प्रशासनाचाही जीव भांड्यात पडला आहे.
जिल्ह्यात सध्या अडीच हजाराच्यावर कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असून त्यांच्यासाठी रोज ५० टन ऑक्सिजनची मागणी आहे. मात्र अगदी काठावर ३५ ते ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. त्यात बेल्लारीतून पुरवठा थांबल्याने जिल्हा प्रशासनाला मोठी चिंता होती. त्यातून मार्ग काढत रोज पुरेल इतक्या ऑक्सीजनची तजवीज करण्यात आली होती. जिल्ह्यातील तीन मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश येऊन आता जिल्ह्याला १० टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा होत आहे. पुण्यातून एक दिवस आड हे टँकर कोल्हापूरमध्ये दाखल होतील.
---