कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून एका दिवशी जवळपास १५० टन ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल इतक्या क्षमतेचे १४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. पूर्वी ही संख्या २३ होती. त्यांपैकी नऊ प्रकल्प रद्द करून ४०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, ८५० जंबो सिलिंडर घेण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजनची सोय करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत अधिक ऑक्सिजनची गरज भासेल याचा विचार करून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सांगितले आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी किती होती त्याच्या तिप्पट प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा तयार ठेवा, अशा शासनाच्या सूचना आहेत. दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची रोजची मागणी ५२ टन होती. त्याच्या तिप्पट म्हणजे १५० टन ऑक्सिजन निर्मितीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सर्व बारा तालुक्यांतील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात हे प्रकल्प उभारले जात आहेत. एप्रिलमध्ये १४ प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पुन्हा केंद्राकडे नऊ प्रकल्पांची मागणी केली होती. मात्र एकदा प्रकल्प उभारला की तो इतरत्र हलविता येत नाही. शिवाय देखभाल, प्रशिक्षित कर्मचारी असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याची गरज अन्य ठिकाणी असले तर उपयोग होत नाही, याचा विचार करून नऊ प्रकल्पांचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
--
ऑक्सिजनची मागणी
पहिल्या लाटेतील मागणी : ३५ टन
दुसऱ्या लाटेतील मागणी : ५२ टन
----
तीन पातळ्यांवर तयारी
ऑक्सिजनबाबत तीन पातळ्यांवर नियोजन केले जात आहे. पहिले म्हणजे ऑक्सिजन निर्मिती, दुसरी जम्बो सिलिंडरची उपलब्धता, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि तिसरे म्हणजे पूर्वीप्रमाणे लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा-साठा. या तीनपैकी एक पर्याय अचानक बिघडला, त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या, तर दुसरा व तिसरा पर्याय तयार असेल.
---