कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळच्या आठवणी सोमवारी जागविण्यात आल्या. शाहू विचारांचा पाईक हरपल्याची भावनाही त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली.सावंत आणि दिवंगत नेते गोविंदराव पानसरे, बाबूराव धारवाडे यांचे घनिष्ट संबंध होते. त्यांच्याच स्नेहामुळे सावंत हे काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला येत असत. १९९९ चा शाहू पुरस्कार सावंत यांना जाहीर झाला. परंतु, चंद्रचूड यांची तारीख न मिळाल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ६ डिसेंबर १९९९ला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला कोल्हापूरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीविषयी त्यांना आस्था होती.इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे शांताराम गरूड यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. प्रबोधिन प्रकाश ज्योती या नियतकालिकाचे नियमित वाचन करून ते नेहमी संपर्क साधत असत, अशी आठवण प्रबोधिनचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितली.पदावर असताना लिहिले पत्रशिवाजी कोण होता हे पुस्तक वाचल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदावर असतानाही सावंत यांनी गोविंदराव पानसरे यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचण्याची गरज असून तशी योजना आपण आखावी, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. अशी आठवण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी सांगितली.
एका नि:स्पृह, प्रामाणिक, समाजाशी नाळ जुळलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. निवृत्तीच्या काळातही कुलगुरू निवडीपासून ते गुजरात दंगलीपर्यंतची, तेथील भ्रष्ट सताधाऱ्यांची चौकशी करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या नि:स्पृह स्वभावाची यामुळे साक्ष मिळते. सावंत यांच्या निधनामुळे केवळ न्यायालय आणि कायद्याशी संबंधितच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.- ॲड. अभय नेवगी,उच्च न्यायालयाचे वकील