(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करू, पण निर्णय मात्र सर्वांना विश्वासात घेऊनच घेऊ, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली. आमदार पाटील यांच्याशी यापूर्वी याबाबत एक बैठक झाली होती, मात्र त्यात बिनविरोधचा विषयच नव्हता, असे त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शुक्रवारी ज्येष्ठ संचालकांना बोलावून घेतले होते. त्यावेळी दोन संचालकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेण्याचा आग्रह धरला होता. त्यावर मुश्रीफ यांच्याशी चर्चा करू, असे आमदार पाटील यांनी सांगितले होते. याबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, पी. एन. पाटील हे मला भेटणार असल्याचे वृत्तपत्रात वाचले. भेटून चर्चा करायला हरकत नाही. त्यांचा नेमका प्रस्ताव काय आहे? हे पाहूया. अद्याप पालकमंत्री सतेज पाटील हे हॉस्पिटलमध्ये आहेत. पी. एन. पाटील व आपण गेली ३०-३५ वर्षे सहकारात काम करत आहे, त्यामुळे चर्चेला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. यापूर्वीही त्यांच्यासोबत बैठक झाली होती, आठ-दहा दिवसांत बसूया, असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यात ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेच्या बिनविरोधचा प्रस्ताव नव्हता, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.