कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेचे ४६ कोटी रुपये दोन लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सप्टेंबर ते डिसेंबरअखेरच्या चार महिन्यांची पेन्शन देण्यात आली आहे.
ज्याच्या नावावर जमीन आहे, त्यांना केंद्र सरकारच्या वतीने महिन्याला ५०० रुपये असे चार महिन्यांचे एकत्रित दोन हजार रुपये दिले जातात. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे. मध्यंतरी पेन्शन योजनेत चुकीची माहिती भरून लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सर्वच खात्यांची चौकशी झाल्यानंतर साधारणत: १८ हजार खातेदार चुकीची माहिती भरून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांतील आयकर परतावा करणाऱ्या ३८०० खातेदारांना नोटिसा काढून लाभ घेतलेल्या रकमेच्या वसुलीचे आदेश दिले. त्यानुसार सुमारे अडीच कोटी रुपये जमाही झाले. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पेन्शनची प्रक्रिया थांबविली होती.
आता केंद्र सरकारने चार महिन्यांची पेन्शन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील दोन लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६ कोटी वर्ग करण्यात आले. त्याशिवाय राष्ट्रीयीकृत बँकांकडील शेतकऱ्यांच्या खात्यावरही वर्ग करण्यात आले.
अपात्र खात्यांवरही पैसे जमा?
पती-पत्नी दोघे लाभार्थी, जमीन नावावर नसलेल्या आदी कारणाने तपासणीत अपात्र ठरलेल्या खात्यांवरही पेन्शनचे पैसे जमा झाल्याची चर्चा सुरू आहे.