कोल्हापूर : ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणात आपण व आमदार पी. एन. पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, याबाबत अधिक बोलण्याची गरज नसल्याचा निर्वाळा, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिला.‘गोकुळ’च्या वतीने मंगळवारी आमदार पी. एन. पाटील व संघाचे संचालक आमदार राजेश पाटील यांचा सत्कार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी महाडिक यांनी भाषण करणे टाळले; पण उपस्थितांनी बोलण्याचा आग्रह धरल्यानंतर, पी. एन. पाटील व आपण एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहे, अधिक बोलण्याची व वेगळे सांगण्याची गरज नसल्याची उस्फूर्त प्रतिक्रिया दिली.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘सामान्य माणूस एखादी मोठी संस्था उभी करू शकत नाही; पण हजारो माणसं एकत्र आली तर चांगली संस्था उभी राहते, याचे ‘गोकुळ’ उत्तम उदाहरण आहे. सहकारी संस्थांमध्ये उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा उत्पादकाला देण्याचा नियम आहे; पण आपल्या उत्पन्नातील ८१ टक्के उत्पादकांना परतावा देणारी ‘गोकुळ’ देशातील एकमेव संस्था आहे. सहकाराशिवाय सामान्य माणसाची प्रगती होणार नाही, याची जाणीव कॉँग्रेस नेत्यांना होती. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात खऱ्या अर्थाने सहकाराला बळकटी देण्याचे काम केल्यानेच साखर कारखानदारी, दूध संघ, सूत गिरण्या उभ्या राहिल्या. त्याच विचाराने आम्हीही संस्थांत काम करत असून, विधानसभा निवडणुकीत सामान्य माणसाने निवडून दिल्याबद्दल धन्यवाद देतो, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अरुण चौगले, सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख, सहकार बोर्डाचे बी. जी. साळोखे, ‘एनडीडीबी’च्या उपव्यवस्थापक डॉ. श्वेता रामटेके यांचा सत्कार करण्यात आला.‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संचालक अरुण डोंगळे, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, विश्वास जाधव, सत्यजित पाटील, रामराजे कुपेकर, अनुराधा पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, प्राचार्य राजेंद्र कुंभार, आदी उपस्थित होते.महाडिक यांची फटकेबाजीला मुरडएरव्ही व्यासपीठ मिळेल तिथे महादेवराव महाडिक आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत; पण ‘गोकुळ’च्या मंगळवारच्या कार्यक्रमात ते स्वत: बोलण्यास तयार नव्हतेच; पण पी. एन. पाटील यांनीही भाषण करू नये, असा त्यांचा प्रयत्न होता.