लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात सुमारे पाऊण तास बैठक झाली. बैठकीतील वृत्तांत समजला नसला तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेली ऑफर त्यावर आलेला प्रतिक्रिया व सत्तारूढ पॅनेलची बांधणी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते. त्यामुळे हालचाली गतिमान झाल्या असून पॅनेल बांधणीसाठी माेर्चेबांधणी सुरू आहे. मागील निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सत्तारूढ गटासोबत हाेते. ते कायम रहावेत, असा प्रयत्न सत्तारूढ गटाचा आहे. याबाबत दोनवेळा बैठकाही झाल्या, मात्र त्यांना दिलेल्या जागेच्या ऑफरवरून राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. यासह काही विद्यमान संचालकही विराेधकांच्या हाताला लागण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत नेमकी व्यूहरचना कशी असावी, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पाऊणतास दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. यावेळी संचालक बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
दोन दिवसांत संचालकांसोबत चर्चा?
सत्तारूढ गटातही हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांत संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली जाणार असल्याचे समजते.