कोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी सोडपत्र घेतलेले नसून यापुढेही त्यांच्याशी मैत्री कायम ठेवण्याच्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या भूमिकेमागे जिल्हा दूध संघातील (गोकुळ) सत्ताकारणच महत्त्वाचे असल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात रंगली.महाडिक यांनी पी. एन. यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यामागे हेच महत्त्वाचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तेथील दूध दोघांनाही चांगले मानवले असल्याने त्यात सतेज-मुश्रीफ कंपनीचे मीठ पडायला नको, असे त्यांना वाटते. गेल्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीतील पैरा फेडायचा म्हणून सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला. आमदार सतेज पाटील यांनी विरोधात पॅनेल उभे करून दोघे संचालक निवडून आणले. शिवाय लढतही अत्यंत चुरशीची झाली. आताही ज्येष्ठ संचालक अरुण नरके हे त्यांना अध्यक्षपद न मिळाल्याने नाराज आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत पी. एन. पाटील, सतेज पाटील आणि मुश्रीफ हे एकत्र आले तर चित्र वेगळे दिसू शकते. महाडिक यांच्या राजकारणाच्यादृष्टीने ही सत्ता महत्त्वाची आहे. त्या सत्तेचे कार्ड वापरूनच ते आपले इतर निवडणुकीतील पत्ते खोलतात. त्यांना गोकुळची सत्ता हातातून जाऊ द्यायची नाही. त्यासाठीच त्यांना पी. एन. तिथे सोबत हवे आहेत. त्यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाच्या लढतीतील नाराजी दूर करण्यासाठी स्वत:हून पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीरपणे मांडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सुनेला अध्यक्षपद तरी मिळाले, आता झाल ेगेले विसरून आपण गोकुळमध्ये गुण्यागोविंदाने नांदू, असा होरा त्यामागे आहे.महाडिकांनी पी. एन. यांचा प्रचार करून दाखवावा : सतेज पाटीलजिल्हा परिषदेवर भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यासारख्यांची संगत असल्याने पी. एन. यांच्या होतकरू मुलाचा राजकारणात बळी गेला, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली होती. याबाबत सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र, ‘दोस्ताना कायम असेल तर पुढच्या विधानसभेला त्यांनी पी. एन. यांचा प्रचार करून दाखवावा,’ एवढी मोजकी प्रतिक्रिया दिली.पी. एन. यांचा बोलण्यास नकारजिल्हा परिषदेच्या निकालानंतर पी. एन. पाटील हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मुंबईला गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपण मुंबईत आहोत. आपल्याला काही माहीत नाही, असे सांगितले. मात्र, याबाबत काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पी. एन. यांच्या स्तुतीमागे गोकुळचे सत्ताकारण
By admin | Published: March 23, 2017 11:59 PM