सांगरूळ : गेल्या लोकसभेला पी. एन. पाटील यांनी मला ३४ हजारांचं मताधिक्य दिले; पण दुर्दैवाने विधानसभेला त्यांचा अवघ्या सातशे मतांनी पराभव झाला. त्याची सल कार्यकर्त्यांसह माझ्या मनात आहे. जोतिबाच्या साक्षीने सांगतो, आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक कुटुंबीय सर्व ताकदीनीशी पाठीशी राहून पी. एन. पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.सांगरूळ (ता. करवीर) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक होते. सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे किती अवघड असते; पण ही गर्दी पाहून कार्यकर्त्यांचे प्रेम किती आहे, याची प्रचिती येत असल्याचे सांगत खासदार महाडिक म्हणाले, विरोधी उमेदवाराचे काय कर्तृत्व आहे? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना केवळ ४६ दिवस ते कार्यालयात गेले. ‘गोकुळ’ला पर्याय म्हणून काढलेल्या दूध संघाचा त्या कर्तृत्ववान बाळाने ‘कार्यक्रम’ केला. आजही दूध उत्पादकांचे चार कोटी रुपये अडकून पडले आहेत. काँग्रेस सरकारने केलेल्या कर्जमाफीत स्व. सदाशिवराव मंडलिकांनी तक्रार केल्याने ११२ कोटी रुपये परत गेले. जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीसोबत राहण्यासाठी कार्यकर्ते तयार नव्हते; पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्व विसरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमच्या विजयासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतील.भगवानराव लोंढे यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, डी. जी. भास्कर, भगवान रानगे, राजेंद्र सूर्यवंशी, सरदार बंगे, सीमा चाबूक, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, कृष्णराव किरूळकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, एकनाथ पाटील, राजेंद्र खानविलकर, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, सत्यजित पाटील, जयसिंग हिर्डेकर, तुकाराम पाटील, संभाजी पाटील, किसनसिंह चव्हाण, अर्चना खाडे, सविता पाटील, अश्विनी धोत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दत्तात्रय बोळावे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एच. पाटील यांनी आभार मानले.शब्द वाया जाऊ देणार नाहीविधानसभेला राष्ट्रवादी सोबत राहात नसल्याने आपण प्रचाराला येणार नसल्याचे हसन मुश्रीफ यांना सांगितले होते; पण शरद पवार यांनी मला शब्द टाकला तो वाया जाऊ देणार नसल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले.त्यावेळी हाच प्रामाणिकपणा दाखवाप्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला मदत करायची. तुम्ही मात्र आमच्या वेळेला बाजूला थांबायचं, हे योग्य नाही. पी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही प्रामाणिक राहतो, तोच प्रामाणिकपणा आम्हाला मिळावा. अरुंधती महाडिक व त्यांचे बचत गट आमच्या प्रचारातराहणार का? असा सवाल करवीरच्या माझी सभापती सीमा चाबूक यांनीकेला.कारवाईची भीती नाहीभाजप सरकारने सहकारी संस्थांवर संचालक म्हणून आपले कार्यकर्ते नेमण्याचा सपाटा लावला आहे. भोगावती आणि श्रीपतराव दादा बँक या ठिकाणी शासन नियुक्त प्रतिनिधी घ्या म्हणून पत्र आले आहे; पण आम्ही त्यांना हजर करून घेणार नाही, प्रसंगी प्रशासक नेमण्याची कारवाई केली तरी बेहत्तर, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.विश्वास पाटील यांची पाठ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे संघाच्या अध्यक्ष निवडीपासून महादेवराव महाडिक यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. या मेळाव्याकडे पाठ फिरवून त्यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्याही अनुपस्थितीची चर्चा होती.
पी. एन. पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:48 AM