कोल्हापूर : गेली अठरा वर्षे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळताना जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणाऱ्या माजी आमदार पी. एन. पाटील यांना बढती देत पक्षाने प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी निवड केली. त्यांच्याबरोबरच माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशवंत हप्पे यांची सरचिटणीस म्हणून तर नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रकाश सातपुते यांची चिटणीस म्हणून निवड केली. आमदार सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे यांची कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे. पी.एन. यांना बढती दिल्याने त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदावर गडांतर आल्याचे मानण्यात येते. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे नांव या स्पर्धेत आता उरले आहे. नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या जाहीर मेळाव्यानंतर खासदार चव्हाण यांनी राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या निवडीबाबत चर्चा केली आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांची यादी तसेच १३ जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. नवीन जिल्हाध्यक्ष कोण? पी. एन. पाटील यांना पक्षाने बढती देऊन प्रदेश समितीवर घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत पक्षीय पातळीवर चर्चा सुरू झाली. गेली अठरा वर्षे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळ्यामुळे पी. एन. यांना पक्षाच्या नियमाप्रमाणे त्या पदावर राहता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून प्रदेशाध्यक्षाना दोन-तीन वेळा आपणाला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती; परंतु इतर जिल्हाध्यक्षांच्या निवडी रखडल्यामुळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णयही प्रलंबित राहिला होता. राज्यातील १३ जिल्हाध्यक्षांच्या निवडीसोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचाही निर्णय अपेक्षित होता. पी. एन. यांना बढती देण्यात आल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कुणाची निवड होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी या निवडी जाहीर केल्या. सोमवारी प्रकाश आवाडे इच्छुक, पण विरोध शक्य जिल्हाध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे इच्छुक आहेत. त्यांनी तशी जाहीर मागणीही प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे; परंतु त्यांना अध्यक्षपद देण्यास पी. एन. पाटील यांचा कडवा विरोध आहे. त्यांनी तो पक्षाकडे बोलूनही दाखविला आहे. आमदार सतेज पाटील यांच्याही नावाची चर्चा होती परंतु आता त्यांची निवड प्रदेशच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून केल्यामुळे त्यांचेही नाव मागे पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस अध्यक्षाची निवड केली गेली नसावी, अशी चर्चा आहे. प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी आपली निवड प्रदेश सरचिटणीसपदावर केली असली तरी आजही मीच जिल्हाध्यक्ष आहे. गेली अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम केले. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता आपल्याकडे ही जबाबदारी नको, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहू, असे आपण प्रदेशाध्यक्षांना सांगितले होते. पुन्हा एकदा तशी विनंती करणार आहे-पी. एन. पाटील
पी. एन. यांना बढती; जिल्हाध्यक्ष कोण..?
By admin | Published: April 13, 2016 12:52 AM