कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची ‘अजिंक्यतारा’ येथे; तर आमदार पी. एन. पाटील यांची गॅरेजवर जाऊन भेट घेतली. भेटीसाठी येणाऱ्यांकडून दोन्ही नेत्यांनी माहिती घेतली.
‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मोठी गर्दी झाली होती. दोन्ही गटांकडून अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक आले होते. नेत्यांच्या सूचनेनुसार काहीजणांनी अर्ज दाखल केले. मात्र काहींना अद्याप सिग्नलच दिलेला नाही. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुकांनी नेत्यांची भेट घेणे पसंत केले.
सत्तारूढ गटाच्या इच्छुकांनी आमदार पी. एन. पाटील यांची फुलेवाडी येथील गॅरेजवर जाऊन भेट घेतली; तर शाहू आघाडीकडून इच्छुकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची ‘अजिंक्यतारा’ येथे कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी इच्छुकांकडून माहिती घेतली.
सिग्नल दिलेले लागले कामाला
ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, ते प्रचाराला लागले आहेत. काहींना नेत्यांनी सिग्नल दिल्याने ते कामाला लागले आहेत. ३६५० ठरावधारक हे जिल्ह्याभर, वाड्यावस्त्यांवर पसरले आहेत; त्यामुळे तिथेपर्यंत पोहोचताना दमछाक होत आहे.