कोल्हापूर : विविध क्षेत्रांतील जागतिक संशोधक, शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी स्थान मिळविले आहे. त्यात प्रा. डॉ. पी. एस. पाटील, के. वाय. राजापुरे, ज्योती जाधव, सचिन भालेकर यांचा समावेश आहे.कॅलिफोर्नियातील स्टँनफोर्ड विद्यापीठाने स्कोप्स या त्यांच्या जर्नलमध्ये जगातील विविध क्षेत्रांतील प्राध्यापक, संशोधकांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यासाठी संबंधित प्राध्यापक, संशोधकाने सादर केलेले संशोधन पेपर, या पेपरचा संदर्भ म्हणून किती जणांनी वापर केला, आदी निकष होते. या क्रमवारीतील अप्लाईड फिजीक्स संशोधनात शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. पाटील यांचा देशात पाचवा, तर जगात ३९१ वा क्रमांक आहे. त्यांचे ४५५ संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
मटेरियल सायन्समध्ये प्रा. राजापुरे यांचा ३२ वा क्रमांक असून त्यांचे संशोधन पेपर १८४ आहेत. या विभागातील माजी प्राध्यापक ए. व्ही. राव यांचा ९३४ वा क्रमांक आहे. जैवतंत्रज्ञान आणि जीवरसायनशास्त्र, वैद्यकीय माहितीशास्त्राच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव आणि माजी विभागप्रमुख डॉ. संजय गोविंदवार यांनी पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान, कंपवात आणि स्मृतिभ्रंश विभागात टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळविले आहे. त्यांचे आठ हजारांहून अधिक सायटेशनस आहेत.
गणित अधिविभागातील सचिन भालेकर यांनी संख्यात्मक व संगणकीय गणित क्षेत्रात देशात सातवा, तर जगात २१८ वा क्रमांक मिळविला आहे. संजय घोडावत विद्यापीठातील प्रा. सी. एच. भोसले यांनीही मटेरियल सायन्समध्ये स्थान मिळविले आहे.