कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील उमेदवारीवरून माजी आमदार के. पी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात खुद्द शरद पवार यांच्यासमोर मुंबईतील बैठकीत मनोमिलनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. या दोघांनी आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, त्याच्या विजयासाठी नक्की प्रयत्न करू, असा विश्वास नेतृत्वाला दिला.
पवार यांनीही त्यांच्याकडून तशी पुन्हा खात्री करून घेतली. पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याने मेहुण्या-पाहुण्यांनी उमेदवारीचा वाद मिटवल्याची चर्चा पक्षात आहे.
विधानसभेच्या उमेदवारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीला राधानगरी मतदारसंघातील उमेदवारीचा विषय निघाला. त्यावेळी के. पी. व ए. वाय. या दोघांनीही ‘आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील,’ असे जाहीर केले. ते ऐकून बैठकीतील सर्वच नेत्यांना धक्का बसला. खुद्द शरद पवार यांनीच या दोघांनाही ‘आता जे तुम्ही म्हणाला ते पुुन्हा एकदा सांगा बरं...’ असे सुचविले व त्यांच्याकडून तसे वदवूनही घेतले. ‘आता जे बोललात त्यात बदल करू नका,’ असाही मिश्किल टोला त्यांनी लगावला. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य जीवन पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे.
पवार यांनी तरुणांना उमेदवारीसाठी प्राधान्य राहील, असे जाहीर केल्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी पवार यांची भेट घेऊन उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नको म्हणून गेली तीन वर्षे उमेदवारीवरून दोघांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाला मूठमाती दिल्याचे जाहीर करावे लागले आहे. दोघांनीही एकाच मतदारसंघावर दावा करीत लढण्याची जय्यत तयारी करून ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर याला अधिकच उकळी फुटली. निवडणुकीनंतर ‘बघून घेण्या’इतपत भाषा गेली. आता मेहुणे-पाहुणे म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया पवार यांच्या समोरच सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी कमी झाली आहे.