कोल्हापूर : काही प्रश्न जातपात आणि भावनेच्या पलीकडे जाऊन सोडवले जातात. याचीच प्रचीती गुरुवारी कोल्हापुरात आली. काही दिवसांपूर्वी येथील लक्ष्मीपुरीतील पन्हाळगडाच्या नावाने सुरू झालेल्या पान शॉपचे नाव बदलण्यासाठी शिवभक्त आक्रमक झाले; पण वस्तुस्थिती समजताच स्वत: खर्च करून शिवभक्ताने फलक बदलला आणि एक चांगला आदर्श निर्माण केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचे नेटकऱ्यांनी स्वागतच केले.या दुकानास मालकाने ‘पन्हाळा पान शॉप’, असे नाव दिले होते. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. किल्ले पन्हाळगडाचे नाव पानपट्टीला देणे काही शिवभक्तांना रुचले नाही, बऱ्याच लोकांनी याचा फोटो स्टेटसला ठेवून निषेध केला. शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनासुद्धा काहींनी हा फोटो पाठवला आणि काही आक्रमक कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की, चला आपण तो बोर्ड फोडून येऊया; पण सुर्वे यांनी असे न करता पानपट्टीचे मालक वसीम पन्हाळकर यांची भेट घेतली.त्यांना हे नाव बदलण्याची विनंती केली की, पन्हाळगडाविषयी आमच्या मनात नितांत आदराची भावना आहे, आपण पानपट्टीला दिलेले नाव हे शिवभक्तांना आवडलेले नाही. तुम्ही हे नाव कृपा करून बदला. यावर पानपट्टीचे मालक वसीम यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच मी हा नवीन फलक बसवला आहे. मी कर्ज काढून पानपट्टी सुरू केली आहे. आता माझ्याकडे खर्च करण्याइतके पैसे नाहीत.यावर सुर्वे यांनी फलकाचा खर्च मी स्वतः करतो; पण नाव बदला, अशी विनंती केली. आता त्या ठिकाणी ‘पन्हाळकर वसीम पान भवन’ या नावाचा नवीन फलक लागला. त्याचे उद्घाटनही हर्षल सुर्वे, अश्कीन आजरेकर, मोहसीन मुजावर, तसेच काही ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झाले.
कोल्हापुरात पान शॉपला पन्हाळगडाचे नाव, शिवभक्त आक्रमक; वस्तुस्थिती समजताच केलं असं काही की...
By संदीप आडनाईक | Published: December 02, 2022 5:44 PM