कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आठवा संशयित अमित रामचंद्र दिगवेकर (वय ३८, रा. कळणे ता. दोडामार्ग ,जि. सिंधुदुर्ग ) याला मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांनी २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.बंगळूर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बंगळूर एसआयटीने संशयित अमित दिगवेकरला अटक केली होती. दरम्यान, गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास कोल्हापूर एसआयटी करीत आहे. या प्रकरणात त्याचे नाव पुढे आले. त्यामुळे त्याचा ताबा सोमवारी (दि. १४) बंगळूर न्यायालयाकडून कोल्हापूर एसआयटीने घेतला.
पानसरे हत्याप्रकरणी दिगवेकरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. तो या प्रकरणातील आठवा संशयित आहे. त्याला कोल्हापूर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांच्या न्यायालयात हजर केले.सरकारपक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजी राणे व संशयित आरोपीतर्फे अॅड. समीर पटवर्धन व अॅड. स्मिता शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी अॅड. राणे यांनी, दिगवेकर हा पानसरे हत्या प्रकरणातील दोन नंबरचा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असायचा.
त्याने बेळगांव येथे बॉम्बस्फोट व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या तावडेबरोबर बैठकाही व्हायच्या. याचबरोबर तो या प्रकरणात फरारी असलेल्या पुणे येथील सारंग अकोलकर याच्या संपर्कात होता. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे दिगवेकरला १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली.अॅड. पटवर्धन म्हणाले, पानसरे हत्या प्रकरणात यापुर्वी संशयित अमोल काळे, भरत कुरणे व वासुदेव सुर्यवंशीला या तिघाना या गुन्हयात वापरलेली दूचाकी व पिस्तुलप्रकरणी तपास यंत्रणेने अटक केली होती.
आताही हेच कारण सांगून अमित दिगवेकरला त्यांनी अटक केली आहे. त्यामुळे त्याला तीन दिवस पोलिस कोठडी द्यावी व भेटण्यासाठी सायंकाळी पाच ते सहा अशी एक तास परवानगी मिळावी. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून जी.जी. सोनी यांनी दिगवेकरला २३ पर्यंत पोलिस कोठडी दिली.