राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रब्बी धान्याला मिळणारा बेभरवशाचा दर, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि उसाला मिळत असलेला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे. कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र घटले आहे. सातारा जिल्ह्यातील पेरक्षेत्र सर्वाधिक कमी झाले असून, आतापर्यंत केवळ सव्वा लाख हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे.कोल्हापूर विभागात खरिपाचे क्षेत्र जास्त असले तरी रब्बीचेही कमी नाही. विभागात ५ लाख २४ हजार ७५० हेक्टर रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यातील सांगली जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ६६ हजार, तर सातारा जिल्ह्यात २ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाच्या तुलनेत २५ टक्केही रब्बीचे क्षेत्र नाही. सांगली जिल्ह्यातील बहुतांश, तर सातारा जिल्ह्यात माण, खटावसह निम्मे तालुके दुष्काळी असल्याने येथे रब्बीचे क्षेत्र वाढते; पण गेली दोन वर्षे सांगली, सातारा जिल्ह्यांत पाऊस चांगला झाला आहे. सिंचनाखालील क्षेत्र वाढल्याने त्याचा थेट परिणाम रब्बी क्षेत्रावर झाला आहे. रब्बीमध्ये पिकविलेल्या गहू, हरभरा, मका, ज्वारीला निश्चित भाव नसल्याने आपल्यापुरते उत्पादन घेणे, एवढीच शेतकºयांची मानसिकता आहे. त्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे.खरिपाची काढणी आॅक्टोबरला संपत असली तरी आपल्याकडे डिसेंबरअखेर रब्बीची पेरणी होते. विभागात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे; पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ६८ टक्केच पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र कमालीचे घटले असून, केवळ २६ तर मक्याची ४३ टक्केच पेरणी झाली आहे. हरभºयाची पेरणी ४५ टक्के झाली आहे.
रब्बी क्षेत्रात पावणेदोन लाख हेक्टरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:57 AM