पडळ फाट्यापासून माजगाव पर्यंतचा रस्ता मुळातच अत्यंत कमी रुंदीचा असल्याने तो अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. अशातच त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचल्या असल्याने बाजूच्या वाहनाला साईड देण्यासाठी अवजड वाहन चालकांला जीव मुठीत घेऊन नेहमीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
काही दिवसांतच ऊस गळीत हंगाम सुरू होणार असून या मार्गावरून कुंभी, दत्त दालमिया, वारणा, राजाराम बावडा , डॉ. डी. वाय. पाटील असळज आदी साखर कारखान्यांसह सातार्डे येथील श्रीकृष्ण ॲग्री गूळ पावडर कारखाना व स्थानिक गुऱ्हाळघरची ऊस वाहतुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु याच साखर कारखान्यांकडील मोलॅसिस व साखर वाहतूक करणाऱ्या मोठ्या अवजड वाहनांसह अनेक लहान मोठ्या वाहनचालकांची रेलचेल सतत मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून सुरू असल्याने या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत आहेत. काही दिवसापूर्वी पडळ येथे बाजूच्या वाहनाला साईड देताना रस्त्यांचा अंदाज न आल्याने मोलॅसिस वाहनचालकाचा ट्रॅक्टर पलटी झाला असतानाच चार दिवसापूर्वी असुर्ले दालमियाची साखर घेऊन तळकोकणाकडे निघालेला ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी होताना वाचून रस्त्याकडेच्या चरीत घसरला होता.
अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याच्या साईड पट्ट्यांची वरवरची मलमपट्टी करण्यात आली असली तरी दर वेळेच्या मुसळधार पावसात त्या पूर्ण खचून जात असल्याने या विभागाकडून त्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
फोटो ओळ- माजगाव येथील वळणावर साखर घेऊन जाणारा ट्रक रस्त्याकडेच्या चरीत घसरला होता.