जोरदार वारा व विजेच्या कडकडासह रविवारी दुपारी झालेल्या दमदार वळीव पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे कापणीयोग्य आलेले उन्हाळी भातपीक भुईसपाट झाले. या पिकाची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सावर्डे, मल्हारपेठ,मोरेवाडी, नवलेवाडी, वाघुर्डे आदी गावातील शेतकरी उन्हाळी भातपीक मोठ्या प्रमाणात घेतात. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे भातपिकांच्या उत्पादनाची हमखास खात्री नसते. त्यामुळे परिसरातील शेतकरी उन्हाळी भातपिकाची रोप लागण करतात. पावसाळ्यातील भातापेक्षा या उन्हाळी भाताचे उत्पादन भरघोस व खात्रीशीर मिळते. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी उन्हाळी भातपिकाकडे वळले आहेत.
काही शेतकरी दलदलीच्या क्षेत्रात लागवड करतात तर अनेक शेतकरी नदीकाठच्या सुपीक जमिनीत रोप लागण करून उत्पादन घेतात.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी भातपीक कापणीस सुरुवात केलेली आहे. रविवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्याने शिवारात पाणी तुंबून भातपीक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा पाऊस हिरावून नेतो की काय अशी अवस्था झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाने भातपीक भुईसपाट झालेले आहे. त्यातच वाफ्यात पाणी तुंबल्याने भात कापणीस अडचण येत आहे. शिवाय हे भात वाफ्याबाहेर काढताना शेतकऱ्यांना जादा मजुरांची गरज भासत आहे. चिखलातून भात बाहेर काढताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
भात कापून, झटपट मळणी करून चार दाणे सुखरूप घरी आणण्यासाठी शेतकरी सध्या शिवारात राबताना दिसत आहे. त्यामुळे सावर्डे परिसरात उन्हाळी भात कापणीची धांदल सुरू झालेली दिसत आहे.
फोटो ओळ : सावर्डे (ता. पन्हाळा) येथे रविवारी दुपारी झालेल्या वळीव पावसाने शिवारात पाणी झाल्याने कापणीयोग्य भात भुईसपाट झालेले आहे. या अवस्थेत शेतकरी चिखलातून भात कापणी करताना दिसत आहेत.