कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक धोक्यात आले असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. भात व नागली पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे.गेल्या पाच-सात वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने दडी मारली आहे. ऐन खरिपाची वाढ होण्याच्या कालावधीतच पाणी नसल्याने पिके अडचणीत आली आहेत. विशेषत: भातपिकाला सतत पाण्याची गरज असते, रोप लागणी झाल्यापासून पाऊस गायब झाल्याने रोप लावलेली जमिनींना भेगा पडल्या आहेत.
माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली, भूईमूग पिके पाण्याअभावी पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी तर भात व नागली पिकांनी माना टाकल्या असून मोठ्या कष्टाने जगवलेली पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे.शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी नुसती भुरभूर होती. मात्र, दिवसभर कडक ऊन राहिले. दुपारनंतर आकाशातून काळे ढग पुढे सरकत राहिले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नुसती भुरभुर सुरू होती. शुक्रवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान २२ तर कमाल ३० डिग्रीपर्यंत पोहोचले होते. किमान तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता.नदीकाठची कनेक्शन जोडण्याची मागणीअनेक गावांत महावितरण कंपनीने नदीकाठच्या विद्युत पंपाची कनेक्शन सोडवलेली आहेत. पाऊस नसल्याने आता शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, मात्र वीज नसल्याने अडचण झाली आहे. महावितरण कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असून कनेक्शन जोडण्याची मागणी करत आहेत.धुक्यामुळे धास्ती वाढलीकोकणसह कोल्हापुरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, मात्र तो कोरडाच गेला. उलट पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली दिसते. साधारणता असे धूके परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पडते. त्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.